नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तहसीलदार यांचे आवाहन
सांगोला - सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात कार्यरत सर्वसाधारणपणे पेट्रोलपंपावर अतिरिक्त स्वरूपामध्ये वाहनांमध्ये इंधनसाठा करण्यासाठी गर्दी होऊन पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी निर्माण होत आहे. या संदर्भात सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, सांगोला तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा साठा सद्यस्थितीमध्ये पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवणे कामी आवश्यक त्या सुचना जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे कडून देण्यात आलेल्या आहेत.
तरी सांगोला तालुक्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही. सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा, तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments