सांगोला - खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूल येथे दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने स्कूलमध्ये दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील या परंपरेनुसार शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण स्नेहसंमेलन रामायण या पवित्र व सांस्कृतिक थीमवर आधारित होते.
या कार्यक्रमासाठी सिंहगड सायन्स कॉलेज, आंबेगाव येथील प्राचार्य डॉ. मगन घाटुळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे रामायण थीमवर आधारित सुमारे एक तासाचे सलग भव्य सादरीकरण. रामजन्म, सीता स्वयंवर, वनवास, लंकादहन, सेतूबंधन, लंकेवरील विजय व प्रभू रामांचे अयोध्येत आगमन अशा रामायणातील महत्त्वाच्या सर्व प्रसंगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावी व मनोहारी पद्धतीने केले. या थीमसाठी आवश्यक असलेले सर्व स्थापत्य व नेपथ्य शाळेतील शिक्षकांनी स्वतः तयार केले होते, ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली.
या रामायण थीमने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून सर्व स्तरांतून या सादरीकरणाचे भरभरून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेचे प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर, अकॅडमिक इन-चार्ज मृणाल राऊत, सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली गायकवाड मॅडम तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments