Type Here to Get Search Results !

आपुलकीच्या आधारामुळे गरजू लोकांच्या आयुष्यात प्रगती दिसेल - मोहन मस्के

आपुलकीच्या वतीने ११ महिलांना उदरनिर्वाहासाठी

साहित्याचे वाटप 


सांगोला ( प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू असलेले काम खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत पोहोचत असून आपुलकीच्या या आधारामुळे गरजू लोकांच्या आयुष्यात नक्कीच प्रगती दिसेल, असा विश्वास संपादक मोहन मस्के सर यांनी व्यक्त केला. 

        आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या सेवाभावी संस्थेच्या वतीने शहर व तालुक्यातील ११ गरजू महिलांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप दै. माणदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्के सर व पत्रकार अशोक बनसोडे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी मस्के सर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

        आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ५ महिलांना शिलाई मशीन, ५ महिलांना शेळी तसेच एका महिलेला पिठाची गिरणी उदरनिर्वासाठी भेट देण्यात आली. सांगोला शहरातील ४, शिरभावी २, वाढेगाव १, लोणविरे १, अकोला १, सोनंद १, मेडशिंगी १, अशा एकूण ११ महिलांना प्रमुख पाहुणे संपादक मोहन मस्के सर्व पत्रकार अशोक बनसोडे यांच्या हस्ते मदत सुपूर्द करण्यात आली.

          प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र यादव यांनी आपुलकीच्या कार्याचा आढावा घेतला. आपुलकीच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याच्या आपुलकीच्या या कार्याला लोक देणगीच्या स्वरूपात हातभार लावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे व अस्तित्व संघटनेचे शहाजी गडहिरे यांनीही आपुलकीच्या कार्याचे कौतुक केले.

           श्री विठ्ठल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन तथा आपुलकीचे सदस्य विठ्ठल बंदरे यांना नाशिक येथे बँकिंग क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर लाभार्थी महिलांनी आपल्याला मिळालेल्या मदतीबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले. 

              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विधिन कांबळे सर यांनी केले तर आभार अरविंद केदार यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार अरुण लिगाडे, सुनिल वाघमोडे यांच्यासह लाभार्थी महिला, त्यांचे नातेवाईक व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    

Post a Comment

0 Comments