Type Here to Get Search Results !

आ.बाबासाहेब देशमुख यांनी विधिमंडळामध्ये वाचला सांगोला तालुक्यातील अवैध व्यवसायांचा पाढाच : तालुक्यातील अवैद्य व्यवसाय बंद करण्याची केली मागणी

 


सांगोला(प्रतिनिधी) - मागील पाच वर्षात अवैध व्यवसायामुळे सांगोला तालुक्याची शांतता धोक्यात आली असुन सांगोला तालुक्यात सुरु असलेला अवैध वाळू व्यवसाय व इतर अवैद्य व्यवसाय बंद करण्याची मागणी विधी मंडळाच्या पाचव्या दिवशीच्या कामकाजात सांगोल्याचे नवनियुक्त आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी लावून धरली.  विधी मंडळात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील अवैध व्यवसायाचा पाढाच वाचला.

तालुक्यातील राजरोसपणे चालणारे अवैद्य वाळू व  अवैध व्यवसायाबाबत विधानसभेच्या प्रश्न उत्तरच्या तासाला आ.बाबासाहेब देशमुख यांनी शुक्रवार (दि.20 रोजी) प्रश्न उपस्थित केला. 

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनाच्या सलग तिसर्‍या दिवशीही आपल्या मतदार संघांपैकी अवैध व्यवसाय व वाळू व्यवसाय या  महत्वाच्या प्रश्नावर आवाज उठविला. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, मान,बेलवन, कोरडा व अप्रुफा या नदीपात्रातील बेकायदेशीर वाळु उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे व भूजल पातळीची हानी होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. वाळू उत्खनन व इतर बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाळू व्यवसाय व अवैद्य व्यवसाय बंद करावेत त्याचप्रमाणे कायदेशीर रित्या बांधकामासाठी गोर गरिबांना वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली

त्याचप्रमाणे एसटी बसेस बाबत सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख तक्रारी केल्या होत्या . त्या तक्रारीची दखल घेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी  सांगोला मतदार संघामध्ये एसटी  बसेसची सुविधा अपुरी पडत आहे. ग्रामीण भागातील मुले शिक्षणासाठी शहरात येत असतात. शाळेसाठी येताना जाताना अनेक विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागत असते त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सेवा उपलब्ध करून द्यावी  अशी मागणीही त्यांनी विधीमंडळामध्ये केली. 

सांगोला तालुक्यात  कधी नव्हे एवढे अवैध व्यवसायात चर्चेत आले आहेत. अवैध व्यवसायामुळे तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ झाली असल्याचे नागरिकांमधूनही वारंवार सांगण्यात येत होते. सांगोला तालुक्यात खुले अवैध व्यवसाय सुरू असल्यामुळे हेच अवैध व्यवसाय  नागरीकांना डोकेदुःखी ठरत होते. अवैध व्यवसायाने डोके वर काढल्याने अनेक तरुण या व्यवसायात गुंतल्याने त्याचे भविष्याला धोका निर्माण झाला आहे.अनेक नागरिकांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी वारंवार केली होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत तालुक्यातील अवैध व्यवसायाचा पाढाच वाचला.

सलग तिसर्‍या दिवशी प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करताना आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण मांडणी ते विधिमंडळात करत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्यांनी पहिल्याच अधिवेशनात तालुक्यातील अवैध व्यवसायाचा पाढाच वाचला असून अवैध व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


सांगोला तालुक्यात  फोफावलेल्या अवैध वाळू व इतर अवैध व्यवसायाच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अवैद्य धंदे हद्दपार करून त्यांना पोसणार्‍या गुन्हेगारी प्रवूत्तीच्या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधीमंडळात अवैध व्यवसायाचा पाढाच वाचल्यामुळे आता तरी सांगोला पोलीस अवैध  वाळू व अवैध व्यवसायाच्या मुळाशी जावून अवैद्य व्यवसाय उखडून काढतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments