Type Here to Get Search Results !

आपुलकी प्रतिष्ठान’च्या वतीने पाच गरजू महिलांना शेळी आणि शिलाई मशीन भेट

गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ‘आपुलकी प्रतिष्ठान’ चे कार्य कौतुकास्पद - दीपक भाकरे


सांगोला (प्रतिनिधी) : शासन आणि प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यास काही वेळा विलंब होतो. मात्र, ‘आपुलकी प्रतिष्ठान’ने वेळेत गरजूंपर्यंत पोहोचून अनेक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा आधार दिला आहे. याच सामाजिक जाणिवेतून आणि पाठबळामुळे प्रतिष्ठानचे कार्य आज सर्वदूर पोहोचले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दीपक भाकरे यांनी केले.

सांगोला येथे ‘आपुलकी प्रतिष्ठान’च्या वतीने सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील चार तर सांगोला येथील एका गरजू महिलेला उदरनिर्वाहासाठी शेळी आणि शिलाई मशीन भेट देण्याचा कार्यक्रम रविवारी आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार दीपक भाकरे बोलत होते,  अध्यक्षस्थानी पत्रकार प्रवीण घोंगडे होते.

यावेळी पुढे बोलताना दीपक भाकरे म्हणाले की, "गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करणे हे सर्वात मोठे पुण्य असून, आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य हे अविरतपणे हाच वसा जोपासत आहेत."

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पत्रकार प्रवीण घोंगडे यांनी सांगितले की, "दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि प्रतिष्ठानच्या प्रामाणिक भूमिकेमुळे आज अनेक कुटुंबांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे. हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी आहे."

या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे साधन मिळाले असून, परिसरातील नागरिकांनी ‘आपुलकी प्रतिष्ठान’च्या या समाजोपयोगी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी आपुलकीच्या वतीने पत्रकार दीपक भाकरे यांचा सुरेशकाका चौगुले तर प्रवीण घोंगडे यांचा गोविंददादा माळी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले. आभार सचिव संतोष महिमकर यांनी मानले.

सांगोला तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या एकल महिलांनी शिलाई मशीन किंवा शेळीसाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपर्क साधून अर्ज भरून द्यावा. सर्वे केल्यानंतर योग्य वाटल्यास त्यांना मदत देता येईल.

- राजेंद्र यादव, अध्यक्ष आपुलकी प्रतिष्ठान सांगोला

Post a Comment

0 Comments