Type Here to Get Search Results !

वाढेगांव येथील नदीत सापडला १२ किलो वजनाचा चंदेरी मासा


वाढेगांव - वाढेगांव ता. सांगोला येथील को. प. बंधाऱ्याच्या नदीपात्रातील पाण्यामध्ये चंदेरी जातीचा १२ किलो वजनाचा मासा सापडला आहे. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वाढेगांव येथे माण, कोरडा व अफ्रुका या तीन नद्या असून जिथे या नद्या मिळतात, तिथे को. प. बंधारा आहे. तेथील पात्र खोल व रुंद आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने उन्हाळ्यातच नदीला पाणी आले होते. येणारे पाणी हे दूरवरून आल्याने नदीपात्रात मासेही मोठ्या प्रमाणात आले होते. नदीपात्र स्वच्छ असल्याने या ठिकाणी रव, गासकापर, निरगील, कटला, सपरनेस, गुगळी, कटरना, चिलाप इ. विविध जातीचे मासे नदीपात्रात आढळतात. सद्या नदीपत्रातील पाणी पातळी कमी होत चालली असल्याने मोठ-मोठे मासे पहावयास मिळत आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी नदीपत्रातील जाळी काढत असताना मोठ्या वजनाचा मासा जाळीत अडकल्याचे लक्षात येताच मासेमारी करणाऱ्यांनी हा मासा नदीपात्रातून बाहेर काढला.  मासेमारी करणारे रोज सकाळी-सायंकाळी जाळीद्वारे मासे काढून विक्रीसाठी ठेवतात. ताजे मासे घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. मासेमारीच्या छोट्या व्यवसायातून उदरनिर्वाह होत असल्याने मासे व्यवसाईकतून समाधान व्यक्त होत आहे. चंदेरी जातीचा एवढ्या मोठ्या वजनाचा मासा पहिल्यांदाच नदीपात्रात सापडला असल्याचे मच्छीमाऱ्याकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments