तालुक्यातील गरजू ११ दिव्यांग बांधव आणि ८५ महिला भगिनींना दिवाळी फराळ व भाऊबीजेनिमित्त साडी वाटप
सांगोला ( प्रतिनिधी) - समाजातील दबलेल्या घटकाने मदतीसाठी हाक मारली असता त्याला ओ देणारी आपुलकी संस्था आहे.आपुलकी प्रतिष्ठान वंचिताच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम करते आहे. असे विचार डॉ. गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणी सांगोलाचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांनी व्यक्त केले.
'एक पणती वंचिताच्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील गरजू दिव्यांग आणि धुणी-भांडी काम करून प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू महिला भगिनींना दिवाळी फराळाचे तसेच भाऊबीजेनिमित्त साडी वाटप रविवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आपुलकी प्रतिष्ठान दानशूर व्यक्तींच्या मदतीने गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवत आहे.गेल्या पाच वर्षापासून 'एक पणती वंचिताच्या दारी' हा उपक्रम राबविला जात आहे.समाजातील वंचित घटकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी समाजातीलच दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा करून वंचितांना दिवाळी फराळ व भाऊबीजेच्या निमित्ताने साडी वाटप व कपडे वाटप केले जात आहे. यावर्षी शहर व तालुक्यातील गरजू दिव्यांग आणि धुणी-भांडी काम करून प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू महिलांना दिवाळी फराळ आणि साडी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.त्यासाठी समाज माध्यमावर आवाहन केल्यानंतर शहर, तालुका, जिल्हा,राज्यातून तसेच देशभरातील देणगीदारांनी सुमारे ९१ हजार रुपयांची देणगी जमा झाली. त्यातून तालुक्यातील ११ गरजू दिव्यांग व धुणी-भांडी काम करून प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू ८५ महिलांना दिवाळी फराळ आणि साडी वाटप करण्यात येत असल्याचे आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यक्रमास दैनिक माणदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्के सर, विजय सांगलीकर, कृष्णाबाई खटकाळे आदी मान्यवर व आपुलकी सदस्य उपस्थित होते. यावेळी बापूसाहेब ठोकळे, विक्रम होवाळ यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यांनी केले तर आभार सचिव संतोष महिमकर यांनी मानले.
एक पणती वंचिताच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आपुलकीने वंचित घटकातील व्यक्तींना प्रत्येकी अर्धा किलोचे पाच दिवाळी पदार्थ, साडी, टॉवेल, सुगंधी तेल,उटणे,साबण, पणती या वस्तूंची भेट दिली.
…………………………………………………
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचाराप्रमाणे भुकेलेल्यास अन्न,तहानलेल्यास पाणी व गरजूला वस्त्र अशा सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून आणि मानवतेच्या भावनेतून दानशूर व्यक्ती वंचित घटकासाठी घासातील घास देण्याचे काम करत आहेत.हीच आपुलकी आहे.यामुळे आहे रे ...आणि नाही रे.... यातील दरी कमी होण्यास मदत होणार आहे.
- बापूसाहेब ठोकळे, सांगोला.

Post a Comment
0 Comments