सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला नगरपरिषदेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'घर घर संविधान' या कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फ्रेमचे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. याचबरोबर नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी कोल्हापूर येथील 'धनवर्धन' या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती निर्मला कोळवणकर व सांगली येथील व्याख्याते श्री. संतोष सिरशीकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळेस मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वर्ग,बचत गटाच्या महिला व नागरिक उपस्थित होते.
भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानापैकी एक असून संविधानाची उद्देशिका ही संविधानाचे सार असून सर्वांनी आपल्या घरात दर्शनीय भागात सदर उद्देशिकाची फ्रेम लावावी, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले. श्री. सिरशीकर यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व विषद करून म्युच्युअल फंड, एसआयपी व इतर माध्यमांत गुंतवणूक करून आर्थिक उद्दिष्ट कसे गाठू शकतो याबाबत सोप्या उदाहरणासह मार्गदर्शन केले. श्रीमती कोळवणकर यांनी लवकर गुंतवणुकीस सुरुवात केल्यास चक्रवाढ व्याजाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन अधिकाधिक आर्थिक लाभ कसा मिळू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळेस उद्देशिकाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. श्री. योगेश गंगाधरे यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती प्रियांका पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
Post a Comment
0 Comments