Type Here to Get Search Results !

जलसंवर्धन पंधरवड्या निमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचा अभिनव उपक्रम


वाढेगांव - माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून व मेडशिंगी ग्रामस्थांच्या सहकार्याने, काही संस्था व व्यक्ती यांच्या मार्गदर्शनातून जलसंवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून पाणी संवर्धनासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली. या उपक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावच्या हद्दीतील अफ्रुका नदीवर पूर्वाश्रमीचे सिमेंट बंधाऱ्यात ६.५ इंच व्यासाचे १००/१०० फुटाचे ५ बोअरिंग घेऊन त्याच्याभोवती पुनर्भरण योजना राबवून बोअरिंगवर २० फूट उंचीच्या छिद्र पाडलेल्या क्रिसिन पाईप लावून त्या पाईपच्या वरीलबाजूस जाळी लावण्यात येणार आहे.  सिमेंट बंधाऱ्याच्या भिंतीशी समांतर अंतरावर ७० मीटरवर एका ओळीत पहिले तीन बोअर घेतले. त्याच्याच पुढे ५० फुटावर पहिल्या तीन बोअरच्या क्रॉस वर २ बोअर घेतले आहेत. या अभियानाचा शुभारंभ माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, गावचे सरपंच प्रतिनिधी प्रतापसिंह इंगोले, माजी सरपंच जालिंदर माने, गावातील सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर झाडबुके, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, राजाभाऊ वाघमारे, प्राचार्य एस.के. पाटील, गणेश पाटील, तानाजी आळतेकर, दत्तात्रय इंगोले, मिलिंद वेदपाठक, प्रशांत पाटील, प्रभाकर कसबे, दगडू कांबळे, प्रभाकर कांबळे, गुंडोपंत साळुंखे, ज्ञानेश्वर तंडे इ. सह सत्यसाई ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मशीनचे पूजन करून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. १०० फुटी पाच बोअरच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमास ‘पंचशतावरी जलसंवर्धन’ असे नामकरण करण्यात आले असून परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी नोंद करून ठेवलेली आहे. पुढील वर्षी याच तारखेला पाण्याची पातळी तपासली जाईल. त्यावेळी सदर अभियानाचे फलित लक्षात येईल असेही अध्यक्ष घोंगडे यानी सांगितले.

या उपक्रमास तालुका कृषि अधिकारी दीपाली जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच या कामासाठी पंढरपूरचे डॉ. भिंगे व शैलेश साळुंखे यांनी १०  हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले.

Post a Comment

0 Comments