सांगोला (प्रतिनिधी):- सांगोल्याच्या जागेवरून शेतकरी कामगार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीने जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लढतील असे जाहीर केल्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा खुलासा करत कोणत्याही परिस्थितीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्ष लढवेल आणि जिंकेल सुद्धा असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीच्या राज्यातील व जिल्ह्यातील नेते मंडळींनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
आज दि. 3 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी च्या देशपातळीवरील नेते मंडळींनी सांगोल्याची जागा शिवसेना उबाटा लढवेल असे जाहीर केले आहे. त्या धरतीवर शेकाप चे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते.
सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असून स्व.आबासाहेबांनी या मतदारसंघाचे 60 वर्षे प्रतिनिधित्व केले. प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी पुरोगामी विचार जपला. वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना राज्यात आणि जिल्ह्यात सहकार्य केले.त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाला सहकार्य करावे. निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता ताकतीने काम करत असून सांगोला विधानसभा मतदारसंघावर बहाद्दर, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बळावर शेकापचा लालबावटा फडकावून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहू असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments