वाढेगांव - नेहमीच नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर करून गेली ३५ वर्षापासून सजीव देखावे, नृत्य तसेच विविध कलेने सांस्कृतिक परंपरा जपणारे मंडळ म्हणून नवरात्र महोत्सव मंडळ, महादेव गल्ली वाढेगाव यांची ख्याती आहे. याहीवर्षी तुळजापूरहुन आलेल्या ज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दरवर्षीच मंडळाचे कार्यकर्ते तुळजापूरहुन ज्योत घेऊन येतात. यानंतर गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्योतीचे स्वागत केले जाते. यावर्षी पारंपरिक वेशभूषेत वारकरी संप्रदाय कला सादर करण्यात आली. श्री विठ्ठलाविषयीचा आदरभाव या नृत्यातून व्यक्त केला गेला. अतिशय बहारदार व सुंदर नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. याशिवाय समाजप्रबोधनपर विषय नृत्यातून सादर केले. पडत्या पावसातही बालकलाकारांनी सादर केलेली नृत्येही अप्रतिम होती. नवरात्रीच्या या कालावधीत इतरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.

Post a Comment
0 Comments