Type Here to Get Search Results !

राजेवाडी तलावातून सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकर्‍यांना आवर्तनाचे पाणी मिळणार - मा.आ.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील

पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी, सकारात्मक प्रतिसाद


सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला व आटपाडी तालुक्याला राजेवाडी तलावातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सांगोल्याचे माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे दूरध्वनीवरून केली असता या दोघांनीही सांगोला व आटपाडी तालुक्याला पाणी सोडण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सांगोला व आटपाडी तालुक्याला राजेवाडी तलावातून आवर्तनाचे पाणी मिळेल असे अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सध्या राजेवाडी कार्यक्षेत्रातील सांगोला व आटपाडी तालुक्यातील सर्व गावातील पिके पाण्याला आलेली आहेत. पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. शेतीच्या व जनावरांच्या तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. राजेवाडी धरणात जिहे कटापूर योजनेतून पाणी सोडण्याचे काम सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केलेले आहे. ना. जयकुमार गोरे यांनी गेल्या पावसाळी आवर्तनात संपूर्ण राजेवाडी तलाव पूर्णपणे भरून घेतलेला आहे. हे राजेवाडी तलावातील पाणी सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळावे यासाठी शुक्रवार दि. 28 मार्च रोजी सकाळी माजी आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे व भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दूरध्वनीवरून बोलून पाणी सोडण्याची विनंती केली. शेतकर्‍यांची पिके पाण्याला आली आहेत. लवकरच आवर्तन सुरू करावे व सांगोला व आटपाडी तालुक्याला राजेवाडी तलावातून पाणी देण्यात यावे अशी मागणी केली. मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ आवर्तन सुरू करून सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राजेवाडी तलावातून आवर्तनाचे पाणी मिळेल. शेतकर्‍यांनी हवालदिल होऊ नये अशी ग्वाही माजी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments